25/05/2016
दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
जगातील सर्वाधिक पशुधन असलेल्या देशामध्ये जरी भारताचा समावेश होत असला तरी सुद्धा जागतिक दुग्ध व्यवसायातील भारताचा हिस्सा केवळ ०.०१ टक्के आणि त्यापैकी महाराष्ट्राचा हिस्सा फक्त ८ टक्के आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करता दुग्धोत्पादन व्यवसायास उज्ज्वल भविष्य आहे हे निर्विवाद. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एक - दोन संकरित जनावरांपासून व्यवसाय करण्यास हरकत नाही. असे असतानाही शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले दिसून येत नाहीत किंवा जे व्यवसाय करत आहेत ते पारंपारिक पद्धतीने करतात किंवा त्यांना व्यवस्थापन जमलेले दिसून येत नाही. दुग्ध व्यवसाय नफ्यात चालण्यासाठी दुधाळ गाईची निवड, पशुपोषण, सभोवतालची परिस्थिती या सर्व गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काळात उत्तम व्यवस्थापनाने खर्च कमी करून दुग्ध व्यवसाय करणे आवश्यक आहे. किफायतशीर दुध उत्पादनाकरिता खालील बाबींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.
* दुधाळ गाईची निवड :
* कमी दूध देणाऱ्या, भाकड गाईऐवजी अधिक दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाईची निवड करावी.
* जास्त विदेशी रक्त प्रमाण असणाऱ्या गाईंना व्यवस्थापन अतिशय चांगले लागते. अन्यथा त्या विविध रोगांना लवकर बळी पडतात. तेव्हा दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त ६२.५ टक्के विदेशी रक्त प्रमाण असलेल्या गाईंची निवड करावी.
* दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील गाय निवडावी व दूध उत्पादनाची प्रत्यक्ष पिळूनच खात्री करावी.
* बाजारात गाई खरेदी करताना दलालामार्फत फसलो जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजारामध्ये येणाऱ्या जनावरांची कोणी खात्री देऊ शकत नाही.
* त्याचबरोबर अनेक ठिकाणावरून गाई विक्रीसाठी आलेल्या असतात, त्यामुळे संसर्गजन्य रोग किंवा इतर आजार व दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* दुधाळ गाईची पाश्र्वभाग मोठा व रुंद असतो.
* गाय ही आकर्षक, तरतरीत, मऊ अंगकातीची निरोगी असावी. गाईची त्वचा ही स्थितीस्थापक असावी.
* कास हाताला मऊ लागणारी, लांब, रुंद आणि ती मागे वरपर्यंत गेलेली असावी, लोंबकळणारी नसावी. तसेच चारही सड सारख्या आकराचे व समान अंतरावर असणे आवश्यक आहे.
* गाईचे डोळे, नाकपुड्या, जबडा, कपाळ, खांद्याची हाडे, पुठ्ठ्याचा भाग, माकड हाडाचा जोड, शेपटीचे मूळ, छातीचा घेर, पाय, खुर इ. अवयव योग्य प्रमाणबद्ध व सदोष आहेत की नाहीत याची खात्री करून मगच खरेदी करावी.
* गोठा व्यवस्थापन : दुभत्या गाईंना आरोग्यदायक थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारा गोठा हवा असतो. दुभत्या संकरीत जनावरांना अधिक आजारांची उत्पत्ती ही अस्वच्छ गोठयामुळे होत असते हे लक्षात घ्यावे. साधारणत: पाच गाईंसाठी २० फूट लांब व ८ फूट रुंद अशी १६० चौ. फूट जागा लागते. गोठा बांधताना तो पूर्व - पश्चिम दिशेस लांब असा बांधावा. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी समोरच्या बाजूच्या भिंतीची उंची ६ फूट तर पाठीमागील बाजूच्या भिंतीची उंची ६ ठ ७ फूट ठेवावी. पैशाच्या उपलब्धतेप्रमाणे दगड किंवा विटाची भिंत बांधून घ्यावी. त्यावर सिमेंटचे अथवा चुन्याचे प्लॅस्टर करावे. त्यामुळे गोचिडांना राहण्यासाठी अथवा अंडी घालण्यासाठी जागा मिळत नाही. समोरील भिंतीलगत २ फूट रुंद, २ फूट उंच आणि आतून दीड फूट खोल गव्हाण बांधून घ्यावी. दर चार फुटावर लोखंडी अँगल्समध्ये एक कडी गाय बांधण्यासाठी बसवून घ्यावी. गोठ्याची उंची सर्वसाधारणपणे १० ते १२ फूट ठेवावी. गोठ्याच्या समोरील व पाठीमागील भिंतीच्या वरील मोकळ्या भागाला चेनलिंक जाळी बसवून घ्यावी. जमिनी मुरूमरहीत किंवा शक्य असल्यास कोबा, फरशी, घडवलेल्या दगडाची करता येते. गव्हाणीपासून जमिनीला साधारण १ फुटास १/२ इंचाचा उतार द्यावा. शेवटी गटार असावी. गोठ्यातील जनावरांना ताज्या व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. शेणखताचे खड्डे किंवा उकिरडा गोठ्यापासून दूर अंतरावर असावा.
* आहार व्यवस्थापन : दुग्धव्यवसायामध्ये जास्तीत जास्त (६० - ९०%) खर्च हा आहारावर होत असतो. त्यामुळे आपल्या दुभत्या गाईची निगा ठेवणे, तिच्या आहाराकडे लक्ष पुरविणे, आहाराचा पूर्णपणे उपयोग करून त्यापासून जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खाल्लेल्या अन्नाचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता ही संकरित गाईत जास्त असते. त्यामुळे योग्य व संतुलित आहार वापरून पूर्णपणे उपयोग करून घेणे हे दुग्घ व्यवसायाचे मूलभुत तत्त्व आहे. सकस व संतुलित आहार गाईंना दिल्यास दूध उत्पादनात सातत्य राहते
ऍग्रो स्पेशल
ShareFavoriteBack
शेळीपालन; नव्हे फक्त बोकडपालन!
4 मे 2016 - 06:15 AM IST
केवळ बोकडपालनाचा मोराडे यांचा अनोखा प्रयोग
बंदिस्त, अर्धबंदिस्त किंवा मुक्त अशा विविध स्तरांवर शेळीपालन हा व्यवसाय आता वाढत आहे. मात्र अर्धबंदिस्त प्रकारामध्ये केवळ बोकड पालनाचा नवा मार्ग म्हसरूळ (ता.जि. नाशिक) येथील पद्माकर मोराडे यांनी चोखाळला आहे. आदिवासी शेतकऱ्याबरोबरच्या या नव्या करार पद्धतीमुळे शेळीपालनातील धोके कमी करत, व्यवस्थापन खर्चात बचत साधली आहे.
ज्ञानेश उगले
नाशिक दिंडोरी रस्त्यावर असलेल्या म्हसरूळ गावालगत पद्माकर मोराडे यांची ७ एकर शेती आहे. त्यापैकी अर्ध्या एकरात अर्धबंदिस्त रचनेचे शेड उभारले असून, त्यामध्ये ५०० सिरोही बोकडाचे पालन केले जाते. होय, शेळ्यांचे नव्हे तर केवळ बोकडाचे पालन केले जाते. त्यासाठी त्यांनी पारंपरिक शेळीपालनाच्या तुलनेमध्ये हा वेगळा प्रयोग केला असून, गतवर्षी ५०० बोकडांची पहिली बॅच विकली असून, त्यातून चांगला फायदा मिळाला आहे.
संवेदनशील घटकांचे प्रमाण केले कमी -
आपल्या अनोख्या ‘बोकड फार्म’विषयी माहिती देताना पद्माकर मोराडे म्हणाले, की शेळीपालन चांगला शेतीपूरक व्यवसाय असल्याचे जाणून होतो. तो करायचा म्हणून त्याचा चार पाच वर्षांपासून अभ्यासही सुरू होता. ‘ॲग्रोवन’मधील शेळीपालनावरील प्रत्येक लेखाची कात्रणे काढून मी ती जपली आहेत. या शिवाय अनेक पुस्तकेही वाचली. राज्यातील अनेक शेळीपालन प्रकल्प पाहण्यासाठी भ्रमंती केली. जिद्दीने यशस्वी शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्याबरोबर अयशस्वी शेळीपालकांनाही भेटलो. त्यांच्याशी बोलताना शेळीपालनातील सर्वांत महत्त्वाची बाब माझ्या लक्षात आली, ती म्हणजे शेळ्यांची लागण, गाभणकाळ, संबंधित रेकॉर्ड ठेवणे, बाळंतपण करणे या बाबी फारच जिकिरीच्या ठरतात. त्यात शेळीपालकाचा वेळ आणि ऊर्जा अधिक खर्च होते. मग एक वेगळीच कल्पना मनात घोळू लागली. मनातील कल्पनेचा नीट विचार करून तिचा पाठपुरावा केला.
- सिरोही जातीच्या शेळी ही मांस उत्पादनासाठी, वजनासाठी चांगल्या असून, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. अशा शेळ्यांचे पालन राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील शिवगंज तालुक्यातील देवासी आदीवासी समाज मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे समजले. त्या विभागातील ११६ शेळीपालकांकडून एक हजार शेळ्या व १५० बोकडांची खरेदी केली. मात्र या शेळ्यांचे संगोपन आदिवासी लोकांनी करावयाची बोली केली. या संगोपनाच्या बदल्यामध्ये त्यांना जन्मलेल्या पिलांतील मादी पिले, दूध आणि खत मिळते. मात्र दर शेळीमागे ७ महिन्यांनी एक बोकड मोराडे यांना द्यायचा असे ठरले. त्यामुळे दर सात महिन्यांनी १००० बोकड त्यांना उपलब्ध होतात.
- या शेळ्यांच्या पहिल्या वेताची ५०० नर पिले मोराडे यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये म्हसरूळ येथील शेतावर आणले. ही पिले दूध पिण्याचा काळ संपल्यानंतर म्हणजेच साधारणपणे अडीच ते तीन महिने वयाची असतात.
..असे आहे गोठा व्यवस्थापन -
अर्धा एकर क्षेत्रामध्ये अर्धबंदिस्त पद्धतीचा गोठा उभारला आहे. १०५ फूट बाय ५५ फूट आकारांचे १० ते १४ फूट उंचीचे बंदिस्त शेड असून, शेडच्या दोन्ही बाजूंस ३० फूट बाय १०० फूट इतकी मोकळी जागा सोडली आहे. शेडमध्ये जमिनीपासून १ फूट उंचावर सिमेंट कोबा केला असून, दोन्ही बाजूंस २० फूट बाय २० फूट या अंतराचे ५ भाग केले आहेत. बोकडांसाठी शेड, पाण्याची टाकी, चारा पालापाचोळा खावयास मोकळी जागा अशी अर्धबंदिस्त रचना या बोकड फार्मची आहे.
- बोकडाच्या नैसर्गिक वाढीसाठी त्यांना ठराविक वेळी चरावयास शेडच्या बाहेर सोडले जाते. तसेच ठराविक वेळी संतुलित आहार दिला जातो.
- पशुवैद्यकांमार्फत बोकडांची नियमित आरोग्य तपासणी होते.
- आहारात गहू, मका, तांदूळ, भरडा, सरकी ढेप यांचा भरडा दिला जातो.
- परिसरातील निम, चिंच आदी मोठ्या झाडांच्या फांद्या वरून तोडून चारा म्हणून दिल्या जातात.
- उपचार व आहारात आयुर्वेदिक औषधींचा वापर केला जातो.
- बोकडांसाठी संपूर्ण शुद्ध पाणी दिले जाते.
बोकडांसाठी वाजवले जाते शास्त्रीय संगीत -
शेडमध्ये सकाळी (साडेसहा ते साडेसात) व संध्याकाळी (साडेसात ते साडेआठ) शास्त्रीय संगीत ऐकविले जाते. त्याचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत बोकडांना खुल्या जागेत सोडले जाते. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणात राहण्याचे समाधान बोकडांना मिळते.
आहार व पाणी व्यवस्थापन -
१) आहारात ६० टक्के कोरडा चारा व ४० टक्के हिरवा चारा व कडधान्ये हे गुणोत्तर वजनवाढीला उपयुक्त ठरते.
-सकाळी साडेआठ वाजता : भरडा (मका+गहू+तांदूळ)
-सकाळी साडेनऊ वाजता : हिरवा चारा (गवत, घासाची कुट्टी)
-दुपारी : कोरडा चारा, सोयाबीनचे भूस, मक्याची कुट्टी
-दुपारी ४ वाजता : मका
- सायंकाळी ७ वाजता : घास
२) बोकडांना गरजेनुसार ठराविक वेळेतच पाणी दिले जाते. वेळा ठरलेल्या असल्यामुळे बोकडांत स्वयंशिस्त राहते. आहारात पाणी जास्त झाल्यास आहार व पाण्याचे गुणोत्तर बिघडून, त्याचा वजनावर विपरीत परिणाम होत असल्याचे मोराडे यांचे मत आहे.
३) दोन एकर क्षेत्रामध्ये यशवंत गवत आणि चारा लागवड केली आहे. त्याच बरोबर अन्य शेतकऱ्यांना रोज दोन टन मका चारा बाजारभावाप्रमाणे खरेदी केला जातो.
४) चारा साठविण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गहू, मका, तांदूळ आदी आहारासाठीचा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. सद्यःस्थितीत त्यांनी १० हजार पोती मका खरेदी केला आहे.
बोकडपालन प्रकल्पासाठी मजुराच्या ४ जोड्या नियमितपणे काम करतात.
अर्थशास्त्र -
- पहिली ५०० बोकडांची बॅच डिसेंबर २०१५ मध्ये बाजारात विकली. मुंबई येथील देवनार, मुंब्रा बाजारात मागील बॅचला २६० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. एका बोकडाचे वजन सरासरी ३५ किलो भरते. म्हणजे एका बोकडाला ९१०० रुपये दर मिळाला. म्हणजे एका बॅचमधून ४५ लाख ५० हजार इतके उत्पन्न मिळाले. एक बोकड त्यांना चार ते साडेचार महिने सांभाळावा लागतो. त्यासाठी घरचा चारा असल्याने प्रतिमाह पाचशे रुपये खर्च होतो.
- सद्यःस्थितीत पाण्याची टंचाई असल्याने केवळ २५० बोकड ठेवले आहेत. उर्वरित बोकडांची विक्री केली. सध्या असलेले ४ महिने वयाचे बोकड आणखी २ महिन्यांनी बाजारात विक्रीसाठी काढण्यात येतील.
- नवीन बोकडाची बॅच पाऊस पडल्यानंतर साधारणतः १५ जुलैच्या आसपास आणण्याचे नियोजन आहे.
शेळीपालनामध्ये हे करायलाच हवे...
* शेळीपालन, बोकडपालनामध्ये व्यावसायिकता जपली पाहिजे.
* प्रत्येक खर्चाची नोंद आवश्यक.
* स्वत:च्या शेतातील चारा असल्यास उत्पादन खर्च कमी होतो.
* गोठ्यात संपूर्ण स्वच्छता हवी.
* पुरेशा प्रमाणात व वेळेवर आहार व्यवस्थापन हवे.
* लसीकरण, औषधोपचार वेळेवरच हवे.
* मरतूक झाल्यास घाबरून न जाता नियोजन करावे.
मोराडे यांचे गुणविशेष :
१) व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास
२) शक्तीस्थाने व संधीबरोबरच कमतरता व धोके यांची माहिती घेत, धोके कमी करण्यासाठी केला प्रयत्न.
३) उत्तम व्यवस्थापन. वेळेचे व कामांचे उत्तम नियोजन.
संपर्क - पद्माकर मोराडे, ९७६३०९७४११