07/01/2021
आपण गेले १० महिन्यांपासून कोरोनाव्हायरसच्या संकटात आहोत. सुरूवात या कोरोनाच्या साथीबद्दलच शंका घेण्यापासून झाली..! कोरोना हा एक गैरसमज आणि कपोलकल्पित असल्याचा ठाम विश्वास सोशल मेडियावर पसरवला जात होता. आता सर्वांनाच ही किती भयानक सत्यपरिस्थिती आहे हे लक्षात आले आहे.
आज हे लिहिण्यास कारण की, अजून एक मोठा गैरसमज सद्ध्या पसरताना दिसत आहे. तो म्हणजे कोरोना संपला.. कोरोना गेला..!!
मित्रांनो, केसेस नक्कीच कमी झाल्या आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ कोरोना संपला असा कदापिही घेऊ नका. सगळीकडे लोक कुठलीही काळजी न घेता वावरत आहेत. सोशल डिस्टंसिंगचे आवाहन हे सर्रासपणे न पाळता लोक एकत्र येत आहेत, गर्दी करत आहेत.
विचार करा. चुक एकदाच फक्त होऊ शकेल. आपण चुकून एकदाच अजाणतेपणे या विषाणूच्या संपर्कात येऊ शकू. त्यानंतर काळजी न घेतल्याबद्दल स्वतःला दोष देण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसेल. तेव्हा मनस्ताप करण्याऐवजी आता आपण काळजी घेऊ या.
कृपया कुठेही गर्दी करू नका. मास्क हा नाक आणि तोंड पूर्ण झाकले जाईल असा घाला. नाकाच्या खाली किंवा हनुवटीवर मास्क घालून काय उपयोग?
शक्यतो गर्दीचे कार्यक्रम, समारंभ करू नये. लग्न, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम, जेथे जास्त लोक जमू शकतात, अशा गोष्टी टाळणे हे आवश्यक आहे. लोक कोरोनाव्हायरस साथीबद्दलचं नियम, क्वारंटाइनचे नियम, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. त्यामुळे आजार पसरण्यास मदत होते.
लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे. अर्थव्यवस्थेसाठी अतिमहत्वाच्या क्षेत्रांना चालू करण्यात आलं आहे. पण याचा अर्थ आपण नियमांमध्ये ढिलाई दाखवण आणि काही झालेलेच नाही असे वावरण हे साफ चुकीचे आहे.
कोरोनाच्या लसीबद्दल खूपच जोरात चर्चा चालू आहे. आपले सरकारदेखील याबाबत योग्य ती पावल उचलत आहे. आपला देश याबाबतीतही इतर पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने काम करत आहे. या लसीबद्दल लोकांमध्ये खूपच जास्त आशावाद दिसतो आहे. या आशावादाचे रूपांतर हे सर्रासपणे निर्धास्तपणात होताना दिसत आहे.
कोरोना लसींचा साठा अतिशय उणे तापमानाला करावा लागतो. (-७०°) सर्वांसाठी या लसीच्या उत्पादनाला किती तरी वेळ लागू शकतो. परत प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी किती वेळ, किती तयारी आणि किती कष्ट लागतील याची देखील कल्पना करा. सोप काम नाहीय ते. तरीदेखील आपण ते साध्य करू. पण तरीदेखील आपण अतिशय काळजी (स्वतःची आणि इतरांची) घेणे गरजेचे आहे. कोरोना लसीबाबत अति-आशावाद बाळगून, आता आपली काळजी संपली आहे, अशा खोट्या आत्मविश्वासात राहू नका.
योग्य मास्क, सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता आणि गर्दीचे कार्यक्रम टाळणे ही आपली नियमित जीवनशैली करणे हाच योग्य मार्ग आहे. हा संकल्प आपण सर्व करू या.
डाॅ. मंगेश पाटे.